Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 8:26-47 in Marathi

Help us?

1 राजे 8:26-47 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, हा माझे वडिल दाविदाला दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.
27 पण परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीवर राहशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी कसे पुरेल!
28 पण कृपाकरून माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझा परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.
29 माझ्या नावाचा निवास याठिकाणी होईल, असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे, जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.
30 परमेश्वरा, इस्राएलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात आहे हे आम्हास माहित आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हास क्षमा कर.
31 जर एखादया व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याविरूद्ध काही अपराध केल्यास त्यास शपथ घ्यावयास लावल्यास व या तुझ्या वेदीसमोर घेतली.
32 तेव्हा ती तू स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्यास त्याप्रमाणे शिक्षा कर. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव व त्याची कृत्ये त्याच्या माथी येवो आणि धार्मिकास निर्दोष ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास बक्षिस देऊन त्याचे समर्थन कर.
33 जेव्हा इस्राएल लोकांचा तुझ्याविरूद्धच्या पापामुळे शत्रूंच्या हातून पराभव होईल व ते त्यांच्या पापापासून मागे फिरतील, तुझ्या नावाने पश्चाताप करतील, प्रार्थना विनंती करून या मंदिरात क्षमा मागतील;
34 तेव्हा स्वर्गातून तू त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना देऊ केला त्यामध्ये त्यांना तू परत आण.
35 त्यांनी तुझ्याविरूद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही. तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील,
36 तेव्हा स्वर्गातून इस्राएली लोक व तुझे सेवक त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव, आणि परमेश्वरा, तू त्यांना वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पाऊस पडू दे.
37 कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड, भेरड, घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील, किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील.
38 असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्राएली लोकांनी आपल्या जीवाला होणारा त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना करतील.
39 तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.
40 आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन रहावे म्हणून एवढे कर.
41 इस्राएली लोकांशिवाय तुझ्या नावासाठी परदेशाहून कोणी आला,
42 कारण तुझे महान नाव बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच, व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली,
43 तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांसही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांस कळेल.
44 परमेश्वरा, कधी तू आपल्या लोकांस शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझ्याकडे प्रार्थना करतील.
45 तेव्हा तू आपल्या स्वर्गातून त्यांची प्रार्थना विंनती ऐक आणि त्यांना मदत कर.
46 जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील.
47 तर बंदी करून नेलेल्या देशात गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चाताप करतील तुझ्याकडून दयेची अपेक्षा करतील आणि ते प्रार्थना करतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून दुष्टाई घडली अशी ते कबुली देतील.
1 राजे 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी