Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 22:11-26 in Marathi

Help us?

1 राजे 22:11-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांच्यापैकी एक कनानाचा पुत्र सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे हे आहे की ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”
12 मग ते सर्वच भविष्यवादी भविष्य सांगत होते. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”
14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”
15 मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्यास विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथ-गिलाद अरामाच्या सैन्यावर आता चढाई करु का?” मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हास यश देईल.”
16 पण राजा त्यास म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनाचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. अशी शपथ कितीदा मी तुला देऊ?”
17 तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
18 मग इस्राएलाच्या राजा यहोशाफाटाला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”
19 इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.
20 परमेश्वराने म्हटले, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ-गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.
21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’
22 परमेश्वर त्यास म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले; जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल.
23 मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकिकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरास वाटते.”
24 मग कनानाचा पुत्र सिदकीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाच्या त्याने तोंडात मारले. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”
25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
26 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
1 राजे 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी