Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 18:5-21 in Marathi

Help us?

1 राजे 18:5-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “देशातील सगळ्या पाण्याच्या ओहोळ व झऱ्यांवर जा, कदाचित खेचरे, घोडी वाचतील एवढे गवत मिळणार आणि म्हणजे सर्व पशू मरणार नाहीत.”
6 तेव्हा त्या दोघांनी तो प्रदेश पाहणी करण्यास आपसांत वाटून घेतला, अहाब स्वत:हा एका वाटेने गेला व ओबद्या दुसऱ्या वाटेने गेला.
7 आणि ओबद्या वाटेत असता, एलीया अनपेक्षीतपणे त्यास भेटला. तेव्हा ओबद्याने त्यास ओळखले व जमीनीवर उपडे पडून त्यास म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”
8 एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या धन्याला सांग.”
9 तेव्हा ओबद्या म्हणाला, “मी काय अपराध केला ज्यावरून तू आपल्या सेवकाला जीवे मारायला अहाबाच्या हाती देतोस?
10 परमेश्वर तुझा देव जिवंत आहे, माझा स्वामीने सर्वत्र तुमचा शोध करायला पाठवले नसेल असे कुठलेच गाव किंवा राज्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही सापडला नाहीत, असे कळले, तेव्हा आपण सापडलात नाही अशी शपथ त्याने त्या राज्याला व राष्ट्राला घ्यायला लावली.
11 आणि आता तुम्ही मला म्हणता, ‘जा जाऊन तुझ्या स्वामीला सांग एलीया या ठिकाणी आहे.’
12 तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले, तर परमेश्वराचा आत्मा तुम्हास दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. तरी मी, तुझा सेवक, लहानपणापासून परमेश्वराचे स्तवन करत आहे.
13 ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा जे मी केले ते माझ्या धन्याला माहीत नाही काय? मी परमेश्वराच्या शंभर संदेष्ट्यांना पन्नास पन्नास असे गुहांमध्ये लपवले आणि त्यांना खायला प्यायला पुरवले.
14 आणि आता तुम्ही म्हणता, ‘जा आपल्या धन्याला सांग की एलीया या ठिकाणी आहे,’ मग तो मला जीवे मारील.”
15 यावर एलीया त्यास म्हणाला, “सैन्यांचा परमेश्वर ज्याच्या समोर मी उभा राहतो तो जिवंत आहे, मी खचित त्याच्या दृष्टीस पडेन.”
16 तेव्हा ओबद्याने अहाबाला जाऊन सांगितले, आणि अहाब एलीयाला भेटण्यासाठी निघाला.
17 अहाबाने एलीयाला पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, “इस्राएलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो?”
18 एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही तर तुम्ही आणि तुमचे वडिल यांच्यामुळे ते उद्भवलेले आहे. कारण तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून बआल दैवतांच्या मागे लागलात.
19 तर आता सर्व इस्राएलाला, बआलाच्या साडेचारशे संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. जे ईजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये.”
20 तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.
21 तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही.
1 राजे 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी