Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 4:20-35 in Marathi

Help us?

लेवी. 4:20-35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.
21 आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरिता पापार्पण होय.
22 एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला,
23 व त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा.
24 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
25 मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
26 शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल.
27 सामान्य मनुष्यांमधून कोणाकडून चुकून पाप घडले किंवा परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे दोषी तो ठरला;
28 आणि त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी.
29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा;
30 मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे.
31 आणि याजकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करील.
32 त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.
33 त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्यास वधावे.
34 याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
35 त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
लेवी. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी