Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 25:12-30 in Marathi

Help us?

लेवी. 25:12-30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण ते योबेल वर्ष होय; ते तुम्हाकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.
13 या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
14 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका.
15 तुम्हास तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या योबेल वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हास जमीन विकावयाची असेल तर योबेल वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल, कारण तो फक्त पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हास विकत आहे.
16 जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हास खरोखर फक्त काही पिकच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल.
17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे मी परमेश्वर तुमचा देव आहे!
18 माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल;
19 आणि भूमी तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित रहाल.
20 तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहणार नाही.
21 चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हास अशी बरकत देईन की जमीन तुम्हास तीन वर्षाचे पीक देईल.
22 मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तोपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल.
23 जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;
24 म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतुद करावी.
25 तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमत्तेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी.
26 आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.
27 तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्यास शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी.
28 पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
29 एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.
30 परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाहीतर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढया त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
लेवी. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी