Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 22:12-23 in Marathi

Help us?

लेवी. 22:12-23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
13 याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलाच्या घरी राहत असेल तर मग आपल्या वडिलाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे परकियाने खाऊ नये.
14 एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यामध्ये घालून याजकास द्यावी.
15 इस्राएल लोक परमेश्वरास अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
16 जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!
17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
18 अहरोन, त्याचे पुत्र व सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की तुम्हा इस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,
19 व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!
20 परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्विकारू नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!
21 एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
22 आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वरास अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
23 गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुशीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
लेवी. 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी