Text copied!
Bibles in Marathi

लूक 9:33-54 in Marathi

Help us?

लूक 9:33-54 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते.
34 तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले.
35 आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.”
36 ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.
37 आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला.
38 तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे.
39 आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो.
40 आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना.
41 तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, “हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.”
42 मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले.
43 मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
44 “या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.
45 परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते.”
46 त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला.
47 तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले,
48 आणि त्यांना म्हटले, “जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे.”
49 तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.”
50 तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.”
51 आणि असे झाले की त्यास वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेम शहरास जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले.
52 मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले,
53 पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता.
54 तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, “हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?”
लूक 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी