Text copied!
Bibles in Marathi

लूक 11:4-27 in Marathi

Help us?

लूक 11:4-27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव.”
5 मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्यास म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे,
6 कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्यास वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’
7 आणि तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दरवाजा लावलेला आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’
8 मी तुम्हास सांगतो की, जरी तो उठून त्यास काही देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तरी त्याच्या मित्राच्या आग्रहामुळे तो खात्रीने उठून त्यास जितक्या भाकरींची गरज आहे तितक्या त्यास देईल.
9 आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल.
10 कारण जो कोणी मागतो त्यास मिळेल. जो कोणी शोधतो त्यास सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल.
11 तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल?
12 किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल?
13 जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हास तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
14 येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता ते, भूत बाहेर आल्यावर, तो बोलू लागला व लोकांचा जमाव आश्चर्यचकित झाला.
15 परंतु त्या जमावातील काही लोक म्हणाले की, भूतांचा अधिपती जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भूते काढतो.
16 आणि काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले.
17 पण त्यांच्या मनात काय होते हे तो जाणून होता म्हणून तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरातील लोक एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.
18 आणि तुम्ही म्हणता तशी जर भूतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हास हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता ‘मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो’
19 पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या साहाय्याने भूते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भूते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
21 जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.
22 परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने विश्वास ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्यास मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
23 जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
24 जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्याबाहेर येतो व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्यास ती विश्रांती मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ‘मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’
25 तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्यास ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.
26 नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे घेतो आणि ते त्या घरात जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
27 तो या गोष्टी बोलला तेव्हा असे घडले की, गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्यास म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस.”
लूक 11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी