Text copied!
Bibles in Marathi

योहा. 9:2-22 in Marathi

Help us?

योहा. 9:2-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, “रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?”
3 येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.
4 ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
5 मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
6 असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला.
7 आणि त्यास म्हटले, “जा, शिलोहाच्या तळ्यात धू.” (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.
8 म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्यास भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, “तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?”
9 कोणी म्हणाले, “हा तो आहे.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे.” पण तो म्हणाला, “मी तोच आहे.”
10 म्हणून ते त्यास म्हणाले, “मग तुझे डोळे कसे उघडले?”
11 त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहवर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”
12 तेव्हा त्यांनी म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला माहीत नाही.”
13 तो जो पूर्वी आंधळा होता त्यास त्यांनी परूश्यांकडे नेले,
14 ज्यादिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.
15 म्हणून परूश्यांनीही त्यास पुन्हा विचारले. “तुला कसे दिसू लागले?” आणि तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला, तो मी धुऊन टाकल्यावर, मला दिसू लागले.”
16 तेव्हा परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” पण दुसरे म्हणाले, “जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हे कशी करू शकतो?”
17 म्हणून, पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने जर तुझे डोळे उघडले तर तू त्याच्याविषयी काय म्हणतोस?” तो म्हणाला, “तो एक संदेष्टा आहे.”
18 म्हणून यहूदी अधिकाऱ्यांनी ज्याला दृष्टी आली होती त्याच्याविषयी त्याच्या आई-वडीलांना बोलवून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून व आता डोळस झाला आहे, यावर विश्वास ठेवला नाही.
19 त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्यास कसे दिसते?”
20 त्याच्या आई-वडीलानी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे; आणि हा आंधळा जन्मला होता हे आम्हास माहीत आहे.
21 तरी आता त्यास कसे दिसू लागले हे आम्हास माहीत नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास माहीत नाही. त्यास विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”
22 त्याच्या आई-वडीलांना यहूदी अधिकाऱ्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण, तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्यास सभास्थानातून घालवावे, असे यहुद्यांचे आधीच एकमत झाले होते.
योहा. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी