Text copied!
Bibles in Marathi

योहा. 12:9-32 in Marathi

Help us?

योहा. 12:9-32 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो तेथे आहे असे यहूद्यातील पुष्कळ लोकांस कळले आणि केवळ येशूकरता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले.
10 पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला.
11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.
12 दुसर्‍या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेम शहरास येत आहे असे ऐकून,
13 खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो.
14 आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला.
15 ‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.
16 या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर, त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते.
17 त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली.
18 त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्यास भेटावयास गेले.
19 मग परूशी एकमेकांस म्हणाले, “तुमचे काहीच चालत नाही, हे तुम्ही पाहता; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”
20 सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते.
21 त्यांनी गालील प्रांतातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की, “साहेब, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”
22 फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले.
23 येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
24 मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो.
25 जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.
26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.
27 आता माझा जीव अस्वस्थ होत आहे आणि मी काय बोलू? हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच या घटकेत आलो आहे.
28 हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”
29 तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.”
30 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे.
31 आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल.
32 आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
योहा. 12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी