2 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत.
3 तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.
4 सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत,
5 नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”
6 नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.”
7 तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.”
8 यहोशवाने लोकांस सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.
9 सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते.
10 मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, “त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.”