14 असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
15 मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
16 ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
17 मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले.
18 तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा.
19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.
20 यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.
21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.
22 मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
23 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
24 ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
25 यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.”
26 नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.