Text copied!
Bibles in Marathi

यश. 1:13-31 in Marathi

Help us?

यश. 1:13-31 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही.
14 तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे.
15 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत.
16 स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा;
17 चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.
18 परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.
19 जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल.
20 परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.
21 विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती, पण ती आज खुन्यांनी भरून गेली आहे.
22 तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे.
23 तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.
24 यांकरीताच प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो कीः “त्यांचा नाश होवो! मी माझ्या विरोधकांचा सूड घेईन, आणि माझ्या शत्रू विरूद्ध मी स्वतः बदला घेईन;
25 मी तुजविरूद्ध आपला हात वळवून, तुझे शुद्धीकरण करून तुझ्यातील निरुपयोगी गोष्टी काढून सर्व प्रकारची अशुद्धता दूर करीन.
26 मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन, त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.”
27 सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल.
28 बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल.
29 “तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल, आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील.
30 कारण तुम्ही पाने कोमजलेल्या एलाच्या झाडाप्रमाणे, व पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.
31 बलाढ्य मनुष्य वाळलेल्या झाडाच्या ढिलपीप्रमाणे दुर्बल होईल व त्याची कामे जाळाच्या लहानशा ठिणगीसारखी राहतील; ती दोन्ही एकत्र जाळण्यात येतील, तो त्यास कोणीही विझवणार नाही.”
यश. 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी