Text copied!
Bibles in Marathi

मार्क 9:13-33 in Marathi

Help us?

मार्क 9:13-33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मी तुम्हास सांगतो, एलीया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले.”
14 नंतर ते शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले.
15 सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले.
16 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?”
17 तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.
18 आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
19 येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”
20 नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
21 नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.
22 पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.”
23 येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.”
24 तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.”
25 येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”
26 नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला.
27 परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.
28 नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?”
29 येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचूनदुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”
30 ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती.
31 कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
32 पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.
33 पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?”
मार्क 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी