Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 8:5-33 in Marathi

Help us?

प्रेषि. 8:5-33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले.
6 फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत.
7 कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले.
8 यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.
9 शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता, तो जादूचे प्रयोग करीत असे; त्याच्या प्रयोगामुळे शोमरोन प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत, तो स्वतःला फार मोठा समजत असे.
10 अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत, ते म्हणत असत, “देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे.”
11 त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांस चकीत केले, असल्याने लोक त्याचे ऐकत असत.
12 परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या.
13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला: आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर, तो फिलिप्पबरोबर राहू लागला; आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून, शिमोन आश्चर्याने थक्क झाला.
14 यरूशलेम शहरामधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले.
15 पेत्र व योहान जेव्हा आले, तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून, प्रार्थना केली.
16 या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता.
17 मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले.
19 “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुद्धा द्या.”
20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो; कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केला.”
21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही.
22 तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी पश्चात्ताप कर, प्रभूला प्रार्थना कर, कदाचित तुइया अंतःकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील.
23 कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाच्या बंधनात आहेस, हे मला दिसून आले आहे.
24 शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा.
25 नंतर पेत्र व योहान ह्यांनी आपली साक्ष लोकांस देऊन, “प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरूशलेम शहरास परत आले, परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.”
26 परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरूशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो.
27 मग तो उठला. व गेला, रस्त्यात त्यास एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता, तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता, तो यरूशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता.
28 आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टयाचा ग्रंथ वाचत होता.
29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.”
30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्यास यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, फिलिप्प त्यास म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हास समजते काय?”
31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले.
32 शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही:
33 त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.”
प्रेषि. 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी