Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 7:32-50 in Marathi

Help us?

प्रेषि. 7:32-50 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्यास तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
33 कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.
34 मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’
35 तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले, असे म्हणून, ‘ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते?’ त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले.
36 मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले.
37 तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’
38 रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.
39 त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून.
40 ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील अशा देवता आम्हास करून दे. कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, हे आम्हास कळत नाही.’
41 मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.
42 तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय?
43 मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’
44 तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले, त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता.
45 जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली, त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणिला. आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.
46 दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली; आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्याची विनंती केली.
47 आणि शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले.
48 तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे.
49 प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
50 माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’
प्रेषि. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी