12 बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या मनुष्यांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
13 बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या मनुष्यांना सांगितले होते.
14 तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो.
15 बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.
16 हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो, ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.
17 मी त्यास पाहीन, पण तो आता इथे नाही. मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा बाहेर येईल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील.
18 नंतर अदोम इस्राएलाचे वतन होईल, आणि सेईरही आपल्या इस्राएली शत्रूंचे वतन होईल, ज्याला इस्राएल आपल्या पराक्रमाने जिंकेल.