Text copied!
Bibles in Marathi

गण. 23:8-22 in Marathi

Help us?

गण. 23:8-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ?
9 मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत.
10 इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल? मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे, आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे!
11 बालाक बलामास म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले. पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.
12 बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय?
13 नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे.
14 तेव्हा बालाक बलामास पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बली दिला.
15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.
16 परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्यास सांगितले. नंतर परमेश्वराने बलामास बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले.
17 म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले?
18 बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक,
19 देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?
20 पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही.
21 त्यास याकोबात काही कष्ट किंवा इस्राएलात त्रास दिसला नाही. त्यांचा परमेश्वर देव त्यांच्याबरोबर आहे, राजाचा जयघोष त्यांच्यात आहे.
22 देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तीमान आहेत.
गण. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी