Text copied!
Bibles in Marathi

गण. 15:15-36 in Marathi

Help us?

गण. 15:15-36 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 हेच नियम सर्वांना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात.
16 हे नियम व विधी तुम्हास आणि तुमच्यात राहणाऱ्या इतरांना एकच असावा.
17 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
18 इस्राएल लोकांशी बोल व त्यांना सांग मी ज्या देशात तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पोहचाल.
19 जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वरास अर्पण करा.
20 मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वरास अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी.
21 मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वरास पिढ्यानपिढ्या द्यावा.
22 जेव्हा तुम्ही परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या या सर्व आज्ञेपैकी कधीतरी नकळत मोडली.
23 परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हास मोशे मार्फत दिल्या आहेत त्या दिवसापासून व पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या आहेत.
24 तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वरास सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा.
25 म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.
26 इस्राएलाच्या सर्व लोकांस आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांस क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
27 पण जर फक्त एकाच मनुष्याने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.
28 त्या मनुष्याने चुकून परमेश्वरापुढे पाप केले. तर त्या नकळत पाप करणाऱ्या मनुष्यासाठी प्रायश्चित करायला याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
29 जो मनुष्य चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
30 पण जर एखादा व्यक्ती काही कृत्य करून उघड विरोध करतो, इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या मनुष्यासाठी किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. त्या मनुष्यास आपल्या लोकांतून काढून टाकावे.
31 कारण त्याने परमेश्वराचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याने माझी आज्ञा मोडली. तर त्या व्यक्तीला पुर्णपणे तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. त्याचा दोष त्याच्यावरच राहील.
32 यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात राहत होते. एका मनुष्यास जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्यास ते करताना पाहिले.
33 ज्या लोकांनी त्यास लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्यास मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.
34 त्यांनी त्या मनुष्यास तिथेच ठेवले कारण त्यास काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
35 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो मनुष्य मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावी.”
36 म्हणून लोक त्यास छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्यास दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
गण. 15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी