4 नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली, आणि स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले.
5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली.
6 झाडे लावलेल्या वनास पाणी पुरवावे म्हणून मी आपणासाठी तलाव निर्माण केले.
7 मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी यरूशलेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अधिक गुरांचे आणि शेरडामेंढरांच्या कळपाचे मोठे धन मजजवळ होते.
8 मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या.
9 जे माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले.
10 जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले, ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही, कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे; आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते.
11 नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.