Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 राजे - 1 राजे 16

1 राजे 16:16-30

Help us?
Click on verse(s) to share them!
16जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा सर्व इस्राएलांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता.
17तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
18नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजमहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
19आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. याने यराबामाप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलाच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
20इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करून उठला तेव्हाची हकिकतही या पुस्तकात आहे.
21इस्राएलाच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिब्नी याच्या बाजूचे असून, त्यास राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते.
22तिब्नीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्नी मारला गेला आणि अम्री राजा झाला.
23यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना, अम्री इस्राएलाचा राजा झाला. अम्रीने इस्राएलावर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता.
24त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.
25अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
26नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
27अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकिकत इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे.
28अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र अहाब हा राज्य करु लागला.
29यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
30परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.

Read 1 राजे 161 राजे 16
Compare 1 राजे 16:16-301 राजे 16:16-30