Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 26

लेवी. 26:8-37

Help us?
Click on verse(s) to share them!
8तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
9मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
10तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
11मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही.
12मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
13मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!
14परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत;
15तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला.
16जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
17मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
18या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन.
19मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
20तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
21तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन.
22मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.
23एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात,
24तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन.
25मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.
26मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
27एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,
28तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन!
29तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल.
30तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
31मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.
32मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
33परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.
34जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील.
35देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल.
36तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.
37कोणी पाठीस लागले नसतांनाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेंकावर पडतील. तुमच्या शत्रूविरूद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार.

Read लेवी. 26लेवी. 26
Compare लेवी. 26:8-37लेवी. 26:8-37