Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लूक - लूक 22

लूक 22:3-32

Help us?
Click on verse(s) to share them!
3तेव्हा बारा प्रेषितांपैकी एकात, म्हणजे यहूदात इस्कर्योतामध्ये सैतान शिरला.
4यहूदा मुख्य याजक लोक व परमेश्वराच्या भवनाचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरुन देता येईल याविषयीची बोलणी केली.
5त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्यास पैसे देण्याचे मान्य केले.
6म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला.
7बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला.
8तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.”
9पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?”
10तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हास भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा.
11आणि त्या घरमालकास सांगा, ‘गुरुजींनी तुम्हास विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’
12तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.”
13तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
14वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला.
15तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती.
16कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.”
17नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा.
18कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.”
19नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.”
20त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.
21परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे.
22कारण मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा पण ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार.”
23आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?”
24तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे.
25तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभूत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे वाटतात.
26परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे.
27तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.
28परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात.
29ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ती केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो.
30म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.
31शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
32परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”

Read लूक 22लूक 22
Compare लूक 22:3-32लूक 22:3-32