Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - मार्क - मार्क 8

मार्क 8:17-37

Help us?
Click on verse(s) to share them!
17ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
18डोळे असून तुम्हास दिसत नाही काय? कान असून तुम्हास ऐकू येत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय?
19मी पाच हजार लोकांस पाच भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांमधून किती टोपल्या गोळा केल्या.” शिष्यांनी उत्तर दिले, “बारा.”
20“आणि चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”
21मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हास समजत नाही काय?”
22ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली.
23मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?”
24त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.”
25नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले.
26येशूने त्याला, “त्या गावात पाऊल देखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले.
27मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पा कैसरीया नामक प्रदेशास जाण्यास निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
28त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.”
29मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.”
30येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”
31तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
32त्याने हे स्पष्टपणे सांगितले, तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्यास दटावू लागला.
33परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.”
34नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
35जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
36मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ?
37जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल?

Read मार्क 8मार्क 8
Compare मार्क 8:17-37मार्क 8:17-37