Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 23

प्रेषि. 23:5-26

Help us?
Click on verse(s) to share them!
5पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे.”
6तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”
7तो हे बोलत आहे तोंच परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फुट पडली.
8कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात.
9तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्त्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, “या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?”
10असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.
11त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.”
12मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.
13हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते.
14ते मुख्य याजक लोक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे.
15तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”
16तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.
17तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे.
18तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.
19तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”
20तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
21तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.”
22तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.”
23मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.”
24आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या.
25शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले.
26“महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम.

Read प्रेषि. 23प्रेषि. 23
Compare प्रेषि. 23:5-26प्रेषि. 23:5-26