Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 13

प्रेषि. 13:20-40

Help us?
Click on verse(s) to share them!
20हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले, त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले.
21मग लोकांनी राजाची मागणी केली, देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले, शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता, तो चाळीस वर्षापर्यंत राजा होता.
22नंतर देवाने शौलाला काढून टाकले, देवाने दावीदाला त्यांचा राजा केले, दावीदाविषयी देव असे बोलला इशायाचा पुत्र, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील.
23याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला, तो वंशज येशू आहे, देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते.
24येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.
25जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हास वाटते? मी ख्रिस्त नाही, तो नंतर येत आहे, त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’
26माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली.
27यरूशलेम शहरामध्ये राहतात ते यहूदी व त्यांचे अधिकारी यांनी त्यास ओळखले नाही, येशू हा तारणारा होता, येशूविषयी जे शब्द संदेष्ट्यानी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले, परंतु त्यांना ते समजले नाही, यहूदी लोकांनी येशूला दोषी ठरवल्याने त्यांनी ते भविष्यावाद्यांचे शब्द खरे ठरवले.
28येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे.
29शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले.
30पण देवाने त्यास मरणातून उठवले.
31यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालील प्रांतापासून यरूशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले, ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.
32आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
33आम्ही त्यांची लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले, देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले, आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतोः ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.’
34शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यास मरणातून उठवले, याविषयी त्याने असे सांगितले आहे की, ‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हास देईन.’
35म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’
36कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले.
37पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले, त्यास कुजण्याचा अनुभव आला नाही.
38बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते.
39मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते.
40संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा.

Read प्रेषि. 13प्रेषि. 13
Compare प्रेषि. 13:20-40प्रेषि. 13:20-40